Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

प्रजापत्र | Friday, 06/05/2022
बातमी शेअर करा

बीड दि.६ – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला आहे. जामीन घेतल्यानंतरही सतत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

 

                 यापूर्वी 10 फेब्रुवारीला कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढले होतं आणि 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र राज ठाकरे हे 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने परळी कोर्टाने दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.राज ठाकरेंविरुद्ध हे दुसरं अजामीनपात्र वॉरंट असून याआधी सांगली न्यायालयानेही ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट बजावलं आहे. हे अजामीनपात्र वॉरंट 2008 च्या एका प्रकरणात जारी करण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 143, 109, 117 आणि बॉम्बे पोलिस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                    मुंबईमध्ये राज ठाकरे यांना ऑक्‍टोबर 2008 मध्ये अटक करण्यात आली होती, या घटनेचे परिणाम राज्यभर उमटले होते.या अटकेविरोधात राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड तसंच बसवर दगडफेक झाली होती. असाच प्रकार परळीमध्ये सुद्धा घडला होता.धर्मापुरी पॉईंट इथे सुद्धा एसटी बसवर दगडफेक झाली होती ज्यामध्ये एसटीचे नुकसान झालं होतं. या घटनेनंतर जमावबंदीचा आदेश मोडणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं आणि चिथावणीखोर वक्तव्य करणं या आरोपात राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांसह गुन्हा दाखल झाला होता यादरम्यान राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. परळी पोलीस ठाण्याने सुद्धा या प्रकरणात तपास पूर्ण करुन आरोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं.

 

मात्र याप्रकरणी राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण या प्रकरणाच्या तारखेला न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिले. यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा आदेश परळी वैजनाथ इथल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement