बीड दि.२५ (प्रतिनिधी)-कोरोनाच्या दोन वर्षानंतर भरलेल्या यात्रेत देवाचा पारंपारिक रथ ओढताना बीड तालुक्यातील जरुड येथील एका १४ वर्षीय तरुणाचा रथाच्या चाकाखाली आल्याने चिरडून मृत्यु झाल्याची घटना रविवारी (दि.२४) दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे.
परमेश्वर नागनाथ बरडे (वय-१४ रा. जरूड) असे मृत तरुणाचे नाव आहे.शहरापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जरूड गावात, प्रतिवर्षी जागृत देवस्थान असणाऱ्या भैरवनाथाची यात्रा भरते. या यात्रेसाठी पंचक्रोशीतील गावातून हजारो भाविक भक्त यात्रेसाठी येत असतात.
मात्र गत दोन वर्षापासून कोरोनाने यात्रा उत्सवावर बंदी असल्याने यात्रा भरली नाही. तर यंदा सर्वच निर्बंध शिथिल झाल्याने मोठ्या उत्साहात यात्रा भरली होती. यावेळी परंपरेने भैरवनाथाचा रथ ओढला जातो. यंदा देखील हा रथ ओढत असतांना प्रचंड गर्दी झाली होती. लहान लहान मुलांसह वृद्ध देखील रथ ओढत होते. याचवेळी परमेश्वर बरडे हा मुलगा रथ ओढत असतांना खाली पडला अन त्याच्या अंगावरून रथाचे चाक गेले. यातच त्याचा जाग्यावर मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेने भाविक भक्तांसह पंचक्रोशीतील नागरिकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.