आष्टी : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून बापलेकाने शेजाऱ्याचा विटाने ठेचून खून केल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाळूज येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. दत्तात्रय भैरवनाथ गावडे (वय ५५ ) असे मृताचे नाव असून याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळुज येथे राहणारे दत्तात्रय भैरवनाथ गावडे यांचा शेजारील विश्वनाथ मुरलीधर खाडे, अमोल विश्वनाथ खाडे, अजय विश्वनाथ खाडे या बापलेकांसोबत सहा महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यावरून खाडे पितापुत्र रागात होते. दरम्यान, मंगळवारी घराबाहेर पडलेले गावडे घरी परतले नाही. बुधवारी सकाळी गावाशेजारील शेतात गावडे यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पाहणीत मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या विटा आढळून आल्या. पोलीस तपासात गावडे यांच्या शेजारील खाडे याची चौकशी केली असता उडावाउडवीचे उत्तरे मिळाली. त्यानंतर खाडे बापलेक फरार झाले. मृताच भाऊ दिगबंर भैरवनाथ गावडे यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ मुरलीधर खाडे, अमोल विश्वनाथ खाडे, अजय विश्वनाथ खाडे या बापलेकांवर बुधवारी रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, प्रभारी पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांनी पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी करीत आहेत.