मुंबई-गेल्या अनेक दिवसांपासून ईडी विरुद्ध संजय राऊत असा एक वेगळा सामना राज्यात रंगताना पाहायला मिळत होता. याआधी संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत जोरदार वाद झाल्यानंतर आता थेट शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे.
मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीनं कारवाई केली असल्याचं सांगितलं जात आहे.
कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया…
दरम्यान, यावर बोलताना संजय राऊतांनी भाजपावर प्रतिहल्ला चढवला आहे. “कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का? २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर. त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही. विचारणा केली नाही. आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली. हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.