संजय मालाणी
बीड : फडणवीस सरकारच्या काळात केवळ घोषणेपुरतेच राहिलेल्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला अखेर मूर्त स्वरूप आले आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यातून महामंडळाला निधीची तरतूद झाली होतीच, आता महामंडळाच्या कार्यालयाचे देखील उदघाटन झाले आहे. कार्यालयाचे उदघाटन हा आपल्यासाठी सुवर्णक्षण असल्याचे सांगणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यामुळे आता ऊसतोड कामगारांना सामाजिक न्यायाच्या आणि संवैधानिक सुरक्षेच्या प्रवाहात आणता येईल आणि त्यांच्या आयुष्यात नवी चैत्र पालवी फुटेल अशी आशा ठेवायला हरकत नाही.
बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. एकेकाळी या राज्यभरातील ऊसतोड कामगारांचे एकमुखी नेतृत्व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. 'मी सत्तेत असलो तरी ऊसतोड कामगारांच्या बाजूने आहे ' अशी भूमिका गोपीनाथ मुंडे घ्यायचे, आणि त्यामुळेच ऊसतोड कामगार देखील गोपीनाथ मुंडेंवर जीव ओवाळून टाकायचे. मात्र गोपीनाथ मुंडेंनंतर या ऊसतोड कामगारांना वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. ती पोकळी आता धनंजय मुंडे भरून काढू पाहत आहेत.
ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. मूळ प्रश्न आहे तो त्यांना ऊसतोड कामगार म्हणून सरकारी ओळख नाही, म्हणजे त्यांची कोठे नोंदच नाही. नोंदच नसल्यामुळे पुढच्या कोणत्या योजना किंवा सुविधा नाहीत. त्यासाठीच ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने कल्याणकारी महामंडळाची घोषणा मागील सरकारने केली होती. मात्र ती घोषणा त्या सरकारच्या काळात केवळ कागदावरच राहिली.
मात्र महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्यायाच्या कक्षा रुंदावल्या असून सामाजिक न्यायाच्या परिघात आता ऊसतोड कामगारांना देखील आणले आहे. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित करण्यासोबतच त्याला निधीची तरतूद देखील करण्यात आली. स्वतः मुंडेंच्या अखत्यारीतील सामाजिक न्याय विभागाकडून हे महामंडळ चालविले जाणार आहे. महामंडळामार्फत आता उघड कामगारांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे, त्यासोबतच भगवानबाबांच्या नावाने वसतिगृहे सुरु होणार आहेत.
महामंडळ कार्यालय उदघाटन प्रसंगी इतर फक्त बोलले , धनंजय मुंडे यांनी ते करून दाखविले ' असे अजित पवारांनी काढलेले उदगार असतील किंवा 'मी ऊसतोड कामगारांना कोयत्याऐवजी पुस्तके द्यायला येणार आहे ' हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला विश्वास असेल, ऊसतोड कामगाराच्या पोटी जन्मलेला व्यक्तीच ऊसतोड कामगारांच्या वेदना समजू शकतो, आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो , हे धनंजय मुंडे यांनी दाखवून दिले आहे. आणि आता हे महामंडळ ऊसतोड कामगारांसाठी चैत्रपालवी ठरेल अशी आशा आहे
प्रजापत्र | Tuesday, 05/04/2022
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा