बीड दि.३० (प्रतिनिधी)-मागील काही महिन्यांपासून धुळे-सोलापूर महामार्गावरील गेवराई ते मांजरसुंबा या परिसरामध्ये हॉटेल, पेट्रोल पंप किंवा रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकांमधून सर्रासपणे डिझेल चोरी केली जात आहे. चोरटे एका पांढर्या रंगाच्या स्कॉर्पिओ व स्विफ्ट कारचा वापर करतात. त्यांना चोरी करताना अनेकांनी पाहिलेले आहेत, तसेच सीसीटीव्हीतही कैद झालेले आहेत. पण पोलीसांना ते सापडत नाहीत, तसेच कधी दिसूनही येत नाहीत हे अश्चर्य! बुधवारी पहाटेच्या सुमारास पाडळसिंगी टोलनाका परिसरातील चार गाड्यातील डिझेल चोरण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पाडळसिंगी टोलनाक्यावर मंगळवारी (दि.29) पहाटे पाच वाजता गाड्या उभ्या करून काही चालक आराम करत होते. यावेळी विना नंबरच्या स्कॉर्पिओमधून आलेल्या पाच जणांनी ट्रक (एम.एच.12 एन.एक्स.9855) मधून 103 लिटर, ट्रक (एम.आर.55 6125) अंदाजे 350 लिटर, ट्रक (एम.एच.21 बी.एच.3191़) 120 लिटर तर माल वाहतूक ट्रक (डी.एन.09 के.9991) यामधून अंदाजे 120 लिटर असे चार वाहनातून 693 लिटर डिझेल याची किंमत 63 हजार 811 रूपये आहे. हे डिझेल काढून स्कॉर्पिओमध्ये असलेल्या कॅनमध्ये भरत होते. यावेळी एका ट्रकचा क्लिनर जागा झाला. त्यांनी त्यांना हटकवले असता त्याच्या गळ्याला चाकू लावून त्याला स्कॉर्पिओमध्ये बसून ठेवले आणि त्याला गढी येथील ब्रिजखाली चालत्या स्कॉर्पिओमधून ढकलून दिले. याची माहिती तेथील काही चालकांनी महामार्ग पोलिसांना दिली. मात्र आमची गाडी खराब आहे, त्यांचा पाठलाग करता येणार नाही असे म्हणून पोलिसांनी आपली जबाबदारी झटकली. याप्रकरणी रमेश महादेव जाधव या कंटेनर चालकाने गेवराई पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सतत डिझेल चोरीच्या घटना घडत असताना रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांना हे चोरटे दिसत कसे नाहीत? तसेच प्रत्येकवेळी स्कॉर्पिओ व स्विफ्टकारच असते? पोलीसांची अन या चोरट्यांची मिलीभगत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बातमी शेअर करा