Advertisement

शेअरमार्केट मध्ये ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून ५० लाखाला गंडवले

प्रजापत्र | Tuesday, 22/03/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई -  ज्यादा परतावा मिळवून देऊत असे आमिष दाखवून पुण्याच्या कंपनीसह एकाने अंबाजोगाई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे यांना ५० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. 

 

 

या प्रकरणी दत्तात्रय ज्ञानोबाराव पाटील आणि अशोक लिंबाजी भोरे (दोन्ही रा. अंबाजोगाई) यांच्या फिर्यादीनुसार, संग्राम घाडगे (रा. पुणे) याच्यामार्फत अशोक भोरे यांची ओळख अभिजीत आप्पासाहेब वाठारे (रा. बाणेर, पुणे) याच्यासोबत झाली. मी शेअर ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये फेरफार करून मोठा फायदा कमावतो असे अभिजीतने सांगितल्याने अशोक भोरे यांनी त्याच्याकडे दोन लाख रुपये गुंतवले. अल्पावधीतच अशोक यांना अडीच लाख रुपये परतावा देऊन अभिजीतने त्यांचा विश्वास संपादन केला आणि जास्त मोठी गुंतवणूक असल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे अशोक यांनी अभिजीतची ओळख दत्तात्रय पाटील यांच्यासोबत करून दिली. यावेळी अभिजीतने एआर ग्लोबल, एआर एन्टप्रायजेस व कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने मी फॉरेक्स व शेअर्स  ट्रेडींग करतो, माझा बांधकाम व्यवसाय असून रोड कन्स्ट्रक्शनमध्ये नागपूरकडे २५०-३०० कोटींचे कामे सुरु आहे, मी आतापर्यत अनेकांना करोडपती केले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने एआर ग्लोबल व एआर एन्टरप्रायझेस या कंपनीमध्ये गुंतवणूकीचा प्लँन सांगून जो नफा होईल येईल त्याचा ५० टक्के परतावा  देण्याचे आमिष दाखवले. तसेच, पाहिजे त्यावेळेस एक महिन्यात ही रक्कम परताव्यासह मूळ रक्कम परत करण्याचे आणि तोपर्यंत परताव्याच्या रकमेसह धनादेश देण्याचेही कबूल केले. अभिजीतच्या भूलथापांना बळी पडून दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे यांनी १५ ते १८ जुलै २०२० या कालावधीत २५ लाख रुपये बँकेतून आणि २५ लाख नगदी असे एकूण ५० लाख रुपये त्या कंपनीत गुंतवले. त्यानंतर तीन-चार महिन्यांनी अभिजीतकडे रकमेची मागणी केली असता त्याने दोघांना पुण्यात बोलावून घेतले आणि भोरे यांच्या नावाने ९८ लाखांचा धनादेश दिला. परंतु, धनादेश पात्रतेची तीन महिन्याची मुदत पूर्ण होण्याआधीच त्याने तो बँकेत लावू नये, रोख रक्कम देतो अशी विनंती केल्याने भोरे यांनी धनादेश बँकेत दिला नाही. परंतु, अनेक महिने उलटले तरी अभिजीतने पैसेही दिले नाही, कॉल घेणेही बंद केले आणि भेटही टाळली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दत्तात्रय पाटील आणि अशोक भोरे यांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून रिलायबल ट्रेडर्स आणि अभिजीत आप्पासाहेब वाठारे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

Advertisement