मुंबई : आशियाई क्रिकेट परिषदेने शनिवारी (१९ मार्च) आशिया चषक २०२२ ची तारीख जाहीर केली. आगामी आशिया कप २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. तसेच क्वालिफायर सामने २० ऑगस्टपासून सुरू होतील, पण एसीसीने त्याचे वेळापत्रक अजूनही जाहीर केलेले नाही. २०१६ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. २०१८ मध्ये शेवटच्या वेळी आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी भारताने ५० षटकांची स्पर्धा जिंकली होती.
७ वेळा आशिया चषकाचे विजेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाच्या नजरा ८ व्या विजेतेपदासह विजयाच्या हॅट्ट्रिककडे असेल. भारताने २०१६ आणि २०१८ मध्ये सलग दोन विजेतेपद पटकावली आहेत. आशिया चषक स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते, पण २०२० ची स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) ने कोरोना महामारीमुळे रद्द केली होती. यामुळे समितीने यंदा ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
सहा संघांच्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या आशियातील पाच कसोटी दर्जाच्या संघांना थेट प्रवेश मिळाला आहे, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांतून निश्चित केला जाईल.