नवी दिल्ली : सवर्सामान्यांना आज महागाईचा जबर झटका बसला आहे. नेस्ले आणि हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपन्यांनी चहा, कॉफी, दूध आणि मॅगी या कंपनीच्या किमतीत वाढ केली आहे. लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या मॅगी नूडल्सच्या किमतीत दोन रुपयांची वाढ झाली आहे. नुकताच दूधाचे भाव वाढले होते.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने ब्रु कॉफीच्या किमतीत ३ ते ७ टक्के वाढ केली आहे. याशिवाय कॉफीची बाटली ३ ते ४ टक्क्यांनी महाग झाली आहे. इन्स्टंट कॉफी पावडरच्या किमतीत ३ ते ६.६६ टक्के वाढ करण्यात आली असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. याशिवाय ब्रुक बॉण्ड चहाच्या दरात १.५ ते १४ टक्के वाढ करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून उत्पादन खर्चात वाढ झाल्याने कंपनीने दरवाढीचा निर्णय घेतला.
दैनंदिन वापरातील वस्तू उत्पादनात आघाडीवर असलेल्या नेस्लेकडून देखील विविध उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. नेस्लेचे लोकप्रिय उत्पादन असलेल्या मॅगीच्या किमतीत दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मॅगी नूडल्सच्या दरात ९ ते १६ टक्के वाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटलं आहे. या दरवाढीनंतर मॅगी मसाला नूडल्सचा भाव १२ रुपयांवरून १४ रुपये झाला आहे. १४० ग्रॅम मॅगी नूडल्सचा भाव ३ रुपयांनी वाढला आहे. तर ५६० ग्रॅम नूडल्सच्या पाकिटाची किंमत आता १०५ रुपये झाली आहे. आधी ती ९६ रुपये होती त्यात ९ रुपयांची वाढ झाली आहे.
याशिवाय नेस्लेकडून पॅकबंद दुधाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे. एक लीटर ए+मिल्कचा भाव ७५ रुपयांवरुन ७८ रुपये करण्यात आला आहे. नेस काॅफीच्या दरात ३ ते ७ टक्के वाढ करण्यात आली आहे. मागील काही महिन्यात महागाईचा दर सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या दरवाढीने महागाईचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे .