Advertisement

गोरगरिबांची दिवाळी यंदा गोड कशी होणार;किराण्याचे भाव सातत्याने वाढू लागले

प्रजापत्र | Thursday, 15/10/2020
बातमी शेअर करा

बीड-कोरोनाच्या लॉकडाऊनपासून किराण्याचे भाव सातत्याने वाढू लागले असून ही दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाहीये.सध्या दिवाळीचा सण एक महिन्यावर आला असून वाढते किराणा मालाचे दर पाहता गोरगरिबांच्या दिवाळी यंदा गोड कशी होणार असा प्रश्‍न आहे. दिवाळीच्या सणासाठी सर्वाधिक साखर, तेल आणि डाळींची मागणी असताना   दर वाढ दिवसेंदिवस चढ गाठू लागली आहे. आज डाळी तर 100 रुपयांच्या आत 1 किलोमध्ये उपलब्ध नसून तेलाचे भावही गेल्या दीड महिन्यात 300 ते 400 रुपयांनी वाढले आहे. तर साखरेची दरवाढ 2 ते 4 रुपयांनी सुरु असून ही दरवाढ आणखी वाढत जाईल असा व्यापार्‍यांनी अंदाज वर्तविला.
लॉकडाऊनच्या मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत बीड शहरात धान्य व किराणा मालाची वाहतूक अत्यंत कमी प्रमाणात होती. परिणामी, स्थानिक बाजारपेठेत येणार्‍या मालाची आवक कमी झाल्याने बाजारभाव दरात वाढ झाली. ज्यांच्याकडे माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता त्यांच्याकडून बाजारातील वाढलेल्या दरानुसार विक्री केल्याने नफेखोरी झाल्याचे प्रकारही समोर आले.कालांतराने अनलॉकच्या प्रक्रियेत दरवाढीला चपराक बसली.मात्र असे असले तरी डाळी आणि तेलांचे भाव सातत्याने वाढत आहे.70 ते 80 च्या घरात असलेली डाळ आज 100 रुपयांच्या पुढे गेले असून तेलाचे दर तर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.1000 ते 1100 रुपयांना मिळणार तेलाचा डबा आज 1500 च्या घरात गेला असून वाढत्या दरवाढीमुळे गोरगरिबांच्या दिवाळी यंदा गोड होणार नसल्याचे दिसून येते.

 

डाळींचे सध्याचे दर (क्विंटलमध्ये)
हरभरा डाळ 5200 ते 5300/6800 ते 7000
मसूर डाळ 7000 ते 7250/7000 ते 7250
मूग डाळ 9098 ते 10000/9098 ते 10000
तूर डाळ 8300 ते 8400/11500 ते 11700
उडीद डाळ 8500 ते 8600/10600 ते 10800

 

सध्याचे तेलाचे दर (15 लीटर)
सूर्यफूल-1500/1800
करडी-2500/2800
शेंगदाणे-2000/2200
सोयाबीन-1400/1600
पाम तेल-1300/1500

Advertisement

Advertisement