मुंबई- आष्टी तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, सामाजिक, राजकीय व शिक्षण क्षेत्रात आगळा वेगळा नावलौकिक स्थापित केलेले ज्येष्ठ नेते साहेबराव थोरवे यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून, त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्याच्या समाजकारणातील एक ऊर्जास्रोत निवर्तला असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी येथील साहेबराव थोरवे दादा यांचे आज पहाटे वयाच्या 120 व्या वर्षी निधन झाले. कडा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, लोकमान्य शिक्षण संस्थेचे संस्थापक त्याचबरोबर आष्टी पंचायत समितीचे अनेक वर्षे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले.
दोन वर्षांपूर्वी श्री. धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा साहेबराव थोरवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून धनंजय मुंडे यांना भेटायला थेट मुंबईला गेले होते. 118 वर्षांचे साहेबराव दादा कोणत्याही आधाराशिवाय या वयातही चालू शकतात, याचे अनेकांना कुतूहल वाटले होते; त्या आठवणी जाग्या करत, त्यांचा हा उत्साह आम्हाला सतत प्रेरणा देत राहील असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी तथा ज्येष्ठ नेते स्व. साहेबराव थोरवे दादा यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.