Advertisement

नगरपालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका एकत्र ?

प्रजापत्र | Thursday, 03/03/2022
बातमी शेअर करा

बीड : राज्यातील महानगरपालिकांसोबतच नगर पालिकांची मुदत संपलेली असून येत्या काही दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत देखील संपत आहे. त्यामुळे नगरपालिका आणि जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणूका एक्ट्राईटच घेता येतील का याची चाचपणी निवडणूक आयोगाने सुरु केली आहे. एकत्रित निवडणुका घेतल्यास किती मनुष्यबळ लागेल आणि ते कसे उपलब्ध होईल याची माहिती घेणे सुरु झाले असून यासाठी महसूल विभाग कामाला लागला आहे. त्यामुळे एप्रिल किंवा मे महिन्यात सर्वच निवडणुका एकत्र होण्याची शक्यता अधिक आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. निवडणूक आयोगाने मागच्या काही दिवसांपासून निवडणुकांसाठीची तयारी वाढविली आहे. नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाने निश्चित केला आहे तर जिल्हा परिषद , पंचायत समित्यांच्या गट, गणांचे आराखडे अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे आता केव्हाही या निवडणुका होऊ शकतात अशी परिस्थिती आहे.
राज्यातील सर्वच २१५ नगरपालिकांची मुदत संपली असून सध्या त्यावर प्रशासक आहे. तर २५ जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांची मुदत देखील १५ मार्चपर्यंत संपत आहे, त्यामुळे याठिकाणीही प्रशासक नेमावे लागणार आहेत. त्यामुळे आता या ठिकाणी त्वरित  निवडणूक घेण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने हालचाली सुरु केल्या आहेत.
नगरपालिकांची प्रभागरचना अंतिम करण्यासाठी निवडणूक आयोगाने १ एप्रिलची तारीख दिली आहे. त्यानंतर प्रभाग आरक्षण होऊन नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषद , पंचायत समित्यांच्याही निवडणुका घेण्याचे संकेत निवडणूक आयोगाकडून मिळत आहेत . असे झाल्यास राजकीय पक्षांना मात्र मोठी धावपळ करावी लागेल.

होणार या निवडणुका
संस्था              राज्य         बीड
नगरपालिका      २१५           ०६
जिल्हा परिषद       २५          ०१
पंचायत समिती   २८४         ११

 

Advertisement

Advertisement