मास्को : Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवरचे हल्ले तीव्र केलेत. एवढंच नाही तर अतिसंहारक बॉम्बचाही मारा सुरू केला आहे. रशियाने युक्रेनवर चक्क व्हॅक्युम बॉम्ब नावाचा अतिसंहारक बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी हाती आली आहे. खारकिव्हवर करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. (Russian attack kills Indian student in Kharkiv )
रशियाने आता युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तातडीने कीव शहर सोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युक्रेनमधील भारतीय नागरिकांना दुतावासाकडून सूचनाही करण्यात आल्या आहेत. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. नवीन शेखरप्पा असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. खारकीव्हमध्ये रशियन सैन्याने भयंकर स्फोट घडवला. त्यामध्ये या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
युक्रेनमधील खारकिव्ह सिटी कौन्सिलवर रशियन सैन्याने मोठा हल्ला चढवला आहे. स्फोटाच्या आवाजाने लोक घाबरुन गेले आहेत. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हच्या नगर परिषदेवर रशियन सैन्याने हल्ला केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये खारकिव्हच्या सेंट्रल स्क्वेअरवरील प्रशासकीय इमारतीजवळ मोठा स्फोट झाला आहे. याशिवाय खारकिव्हमध्येही गोळीबार करण्यात आला आहे.