Advertisement

चार कारखान्यांसाठी शासनाने घेतली थकहमी, पण जिल्हा बँकेसमोर धर्म संकट

प्रजापत्र | Wednesday, 14/10/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यातील चार सहकारी साखर कारखान्यांना या गळीत हंगामासाठी अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने थकहमी घेतली आहे. या हमीवर बँकांनी या कारखान्यांना कर्ज देणे अपेक्षित आहे. मात्र आता ही थकहमी जिल्हा बँकेसाठी डोकेदुखी थिनर आहे. थकहमीनुसार कर्ज द्यायचे तर पैसे आणायचे कुठून आणि कर्ज नाकारण्याची वेळ आली तर वैद्यनाथ सारख्या कारखान्याला उत्तर काय द्यायचे हे धर्मसंकट जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर असणार आहे.
बीड जिल्ह्यातील सुंदरराव सोळंके (१९. ६२ कोटी ), वैद्यनाथ (१६. ५६ कोटी ) ,जय भवानी (९. ७२ कोटी ) अंबाजोगाई साखर (९. ७२ कोटी ) या चार कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जासाठी राज्य शासनाने थकहमी घेतली आहे. आता या थकहमीच्या आधारे या कारखान्यांनी कर्ज उभेकऱ्याचे आहे. यातील सुंदरराव सोळंके, जय भवानी आणि अंबाजोगाइ या कारखान्यांना राज्य सहकारी बँकेचे कर्ज मिळू शकते . मात्र वैद्यनाथ ने  बीड जिल्हा बँकेकडे कर्जमागणी प्रस्ताव दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वैद्यनाथला जरी १६. ५६ कोटीची थकहमी असली तरी या कारखान्याने २५ कोटीच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव दिला आहे. आता मागील ३ वर्षांपासून तोट्यात असलेल्या आणि उणे नेटवर्थ असलेल्या या कारखान्याला थकहमीपेक्षा अधिक कर्ज मंजूर करायचे कसे ? किंवा नकार तरी कसा द्यायचा हा प्रश्न संचालक मंडळासमोर आहे. या प्रस्तवावर चर्चा करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक १६ रोजी होणार आहे.
दुसरीकडे जिल्हा बँकेने जर वैद्यनाथला कर्ज दिले तर इतर तीन कारखानेही राज्य सहकारी बॅंकेऐवजी जिल्हा बँकेलाच कर्ज मागणी करण्याच्या तयारीत आहेत तसेच हे कारखाने देखील थकहमीपेक्षा अधिकच्या रकमेचे कर्ज मागू शकतात , अशावेळी वैद्यनाथला एक आणि इतरांना वेगळा न्याय कसा लावायचा आणि सर्वांना सारखा न्याय लावायचा तर पैसे आणायचा कोठून या प्रश्नाला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला सामोरे जावे लागणार आहे. आता या धर्म संकटातून जिल्हा बँक कसा मार्ग काढते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

 

Advertisement

Advertisement