नवी दिल्ली: सध्या रशिया-युक्रेन सीमेवर (Russia-Ukraine Conflict) मोठा तणाव आहे. लाखो रशियन सैनिक युद्धासाठी सज्ज आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (vladimir putin) कुठल्याही क्षणी युद्धाचे आदेश (War order) देऊ शकतात. रशियाने युक्रेनला लागून असलेल्या सीमेवर S-400 मिसाइल प्रणाली तैनात केली आहे. त्याशिवाय सुखोई फायटर विमानांचा ताफाही सज्ज आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील डोनेत्सक आणि लुगंस्क या दोन प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. पुतिन यांचं हे पाऊल म्हणजे एकप्रकारे युद्धाची चाल आहे. एकूणच युरोपच्या आकाशात युद्धाचे ढग जमले आहेत. रशिया-युक्रेनमधल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारला युक्रेनमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या नागरिकांची चिंता आहे. त्यासाठीच भारताने मिशन AIRLIFT सुरु केलं आहे.
1947 ड्रीमलायनर हे विशेष विमान
भारत सरकारने AIR INDIA चं 1947 ड्रीमलायनर हे विशेष विमान युक्रेनला पाठवलं आहे. आज सकाळी 7.40 च्या सुमारास या विमानाने दिल्लीवरुन कीवसाठी उड्डाण केलं. युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी या आठवड्यात एकूण तीन विमान कीवला पाठवण्यात येणार आहेत. आज रात्री 254 भारतीय कीववरुन दिल्लीमध्ये दाखल होतील. कीव ते दिल्ली प्रवासाला आठ तास लागतात. भारत सरकारने याआधी सुद्धा युद्धग्रस्त प्रदेशातून भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी मिशन एअरलिफ्ट राबवलं आहे.
तीन विमानं पाठवणार
मागच्यावर्षी अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांना सुरक्षित आणण्यासाठी इंडियन एअर फोर्सने आपली विशेष विमान पाठवली होती. 25 फेब्रुवारीला सकाळी सात वाजता, त्यानंतर 27 फेब्रुवारीला सकाळी सात आणि संध्याकाळी 7.35 वाजता कीववरुन विशेष विमानं भारतासाठी उड्डाण करतील. एअर इंडियाशिवाय अन्य विमान कंपन्याही कीववरुन दिल्लीसाठी विमाने संचालित करत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एडवायजरीमध्ये ही माहिती दिली आहे.
यूक्रेनच्या सीमेवर सव्वा लाखापेक्षा जास्त रशियन सैन्य
सव्वा लाखापेक्षा जास्त रशियन सैन्यानं आधीच यूक्रेनच्या सीमेवर तळ ठोकलेला आहे. नव्या आदेशानंतर यातलं निम्म सैन्य तरी आता ह्या नव्यानं तयार झालेल्या दोन्ही देशात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष पुतीननं तसा आदेश दिलाय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर यूक्रेन आणि रशिया यांच्यातला तणाव आणखी वाढला आहे.