बीड-ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून-तहसिलदार सचिन खाडे यांच्याविरोधात वाळू माफियांकडून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्याचा निषेध करण्यासाठी आणि गुन्हे मागे घेण्यासाठी सोमवारी (दि.२१) जिल्हाभरातील सर्वच महसूल कर्मचार्यांनी लेखणी बंद आंदोलन केले. या आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व त्यांच्या सहकार्यांनी काही वाळू माफियांच्या विरोधात कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर वाळू माफियांनी खाडे यांच्या घरासमोर जावून अश्लिल भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. खाडे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्याने महसुल विभागाने लेखणीबंद आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे महसुल विभागाचे कामकाज ठप्प झाले होते. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्यांनी धरणे धरले. खाडे यांच्या विरोधात दाखल केेलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
जिल्हाधिकार्यांनी संपकर्यांना झापले
जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांनी अचानक संप पुकारल्याने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सोमवारी (दि.२१) संपकर्यांना बोलावून घेत संपाची सूचना न देता संप पुकारला कसा? असा सवाल करत संपकर्यांना झापल्याची प्राथमिक माहिती आहे.