जळगाव : जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील तापी नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवारी सकाळी ९ वाजता घडली. नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रात पडलेल्या खड्ड्यात अडकून या तरुणाचा बळी गेला आहे. अक्षय राजू सपकाळे (वय २०) असं मृत तरुणाचे नाव आहे. धामणगाव येथील तरुण अक्षय हा आज रविवारी काही मित्रांसह तापी नदीत पोहोण्यासाठी गेला होता. काही मित्रांनी पोहण्यास सुरुवात केली, तर इतर मित्र मोबाइलमध्ये फोटो, व्हिडिओ तयार करण्यात दंग होते. अशातच नदीत असलेल्या एका खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेला अक्षय पाण्यात बुडाला. त्याने मदतीसाठी आटापीटा केला. त्यानंतर याच परिसरात मासे पकडणाऱ्या एका तरुणाने बुडालेल्या अक्षयला पाण्यातून बाहेर काढले.
पोटातून पाणी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अक्षयचे कुटुंबीय व नातेवाइकांना धक्का बसल्याने त्यांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
                                    
                                
                                
                              
