मुंबई: कोरोना संकटातून अनेकविध क्षेत्र हळूहळू सावरत असताना नवीन नोकरीच्या संधीही उपलब्ध होत आहेत. खासगी आणि सरकारी कंपन्यांनी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यातच आता बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी गुड न्यूज आहे. महाराष्ट्रातील एका बँकेत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव यांबाबत सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे सांगितले जात आहे.
कोणत्या पदांसाठी मागवतायत अर्ज?
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेमधील भरतीअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक,अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी या पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/बीटेक इन सीएस/आयटी किंवा एमसीए/एमएससीपर्यंत शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. यासाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
उमेदवाराचे वय ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे
ऑफिसर ग्रेड पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/बीटेक इन सीएस/आयटी किंवा एमसीए/एमएससीपर्यंत शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.यासाठी उमेदवाराचे वय ३३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्युनिअर ऑफिसर या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई/बीटेक इन सीएस/आयटी किंवा एमसीए/एमएससीपर्यंत शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारास संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. तसेच उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज १ मार्चपर्यंत पाठवायचे आहे.
दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साइझ फोटो अशी कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. 
 
                                    
                                
                                
                              
