१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम पुन्हा सक्रिय झाला असून भारतात अतिरेकी कारवाया करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने ( NIA) दाऊद इब्राहिम विरोधात एक एफआयआर दाखल केला आहे. या माध्यमातून ही माहिती समोर आली असल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
दाऊद इब्राहिम हा भारतात घातपात घडवण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्याने एक विशेष टीम तयार केली आहे. ही टीम भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते, प्रमुख उद्योजक यांना लक्ष्य करणार असल्याचं एफआयआरमधुन उघड झालं आहे. एवढंच नाही तर स्फोटकं आणि घातक शस्त्रास्त्रे यांच्या सहाय्याने देशामध्ये विविध भागामध्ये हिंसाचार घडवण्याची योजना दाऊद इब्राहिमने आखली असल्याची माहिती आहे. यामध्ये दिल्ली आणि मुंबई या शहरांना लक्ष्य केलं जाणार असल्याची माहिती उघड झाल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.
दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला मनी लाँडरिंगच्या चौकशीच्या संदर्भात शुक्रवारी अटक केली. कारागृहात असलेल्या कासकरवर नुकताच मनी लाँडरिंग गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे ही घडामोड घडत असतांना दाऊद इब्राहिमबद्दलची ही खळबळजनक माहिती समोर आली आहे.