लवकरच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि भाजपा एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई महानगरपालिकेनं नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणे यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार होती. त्याचा तपास करण्यासाठी पालिकेनं नोटीस बजावली आहे.
राणे यांच्या ‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार पालिकेला मिळाली होती. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. त्या तक्रारीच्या आधारे आता राणे यांच्या बंगल्याची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेनं नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे. महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचे पथक आज त्यांच्या बंगल्यात जाऊन तपासणी करेल, असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं.
तसेच हे पथक आज बंगला आणि परिसराची पाहणी करून मोजमाप करेल तसेच त्याचे फोटो काढतील. ज्यावेळी पालिकेचं पथक तपासणीसाठी येईल त्यावेळी तुम्ही बंगल्याची कागदपत्र घेऊन तिथं हजर राहा, असं या नोटीशीमध्ये सांगण्यात आलंय.