( बीड )केज : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या निवडीनंतर मिरवणूक काढणे नेत्यांच्या अंगलट आली आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वीच केजच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह २०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केज नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची निवड सोमवारी केज नगर पंचायतीच्या सभागृहात बिनविरोध झाली. यानंतर नगर पंचायत कार्यालयापासून नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचा आदेश जारी केलेला असतानाही ही निवडणूक निघाली.
आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सिताताई बनसोड, नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा शितल दांगट, नगरसेवक पती हारुन इनामदार, अंकुश इंगळे, आदीत्य अशोकराव पाटील, नगरसेवक पती पशुपतीनाथ दांगट, सोमनाथ गुंड, नगरसेवक पती - सुग्रीव कराड, पल्लवी रांजनकर, पदमीन शिंदे, शकील ईनामदार यांच्यासह २०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या फिर्यादीवरून ठाण्यात गुरनं ३९/२०२२ भा दं वि. १४३, १८८ व १३५ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करीत आहेत.