Advertisement

... तर मी राजकारण सोडून देईन

प्रजापत्र | Tuesday, 15/02/2022
बातमी शेअर करा

शिवसेना खासदार संजय राऊत आज आपली बहुचर्चित पत्रकार परिषद घेत आहेत. यामध्ये ते भाजपच्या साडेतीन नेत्यांना तुरुंगात टाकणार असल्याचे म्हणाले होते. यावेळी त्यांनी भाजपच्या अनेक आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत. 2009 मध्ये अन्वय नाईकांनी कोर्लई गावात 19 बंगले बांधले. हे बंगले उद्धव ठाकरेंचे असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, 'भाजपने महाराष्ट्रात नालायकपणा सुरु केला आहे. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असे कधी घडले नव्हते. या पध्दतीचे राजकारण राज्यात यापूर्वी कधीच झाले नव्हते. भाजपकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांविषयी दर दिवशी काही आरोप केले जात आहेत. किरीट सोमय्या म्हणतात की, ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले बांधून ठेवले आहेत. माझे सोमय्यांना आव्हान आहे. कधीही सांगा. आपण चार बसेस करु आणि त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले दिसले तर मी राजकारण सोडीन. जर दिसले नाही. तर त्या दलालाला अख्खी शिवसेना जोड्याने मारेन.'

 

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'दिशाभूल करायची, भंपकपणा करायचा असे काम भाजपचे सुरु आहे. चला दाखवा मग बंगले, आपण पार्टी करु. हा भंपकपणा सुरु आहे. ही महाराष्ट्राविषयी असूया आहे. मराठी भाषेविषयी असूया आहे. मुंबईतून मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची असू नये अशी पीटिशन किरीट सोमय्यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. जो माणूस मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला. आणि काय तुम्ही सांगता की, मराठी भाषेचा अभिजात दर्जा आम्ही देतो म्हणून.' असे म्हणत राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

Advertisement

Advertisement