भारताने पुन्हा एकदा चीनवर मोठा सायबर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या 54 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये ब्युटी कॅमेरा आणि स्वीट सेल्फी एचडी सारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
बॅन केलेल्या अॅप्सच्या यादीमध्ये सेल्फी कॅमेरा, इक्वलायझर आणि बास बूस्टर, कॅमकार्ड फॉर सेल्सफोर्स अँट, आयसोलँड 2: अॅशेस ऑफ टाइम लाइट, व्हिवा व्हिडिओ एडिटर, टेनसेंट एक्सरिव्हर, ऑनमोजी चेस, ऑनमोजी अरेना, अॅपलॉक आणि ड्युअल स्पेस लाइट यांचा समावेश आहे.
युजर्सचा डेटा लीक करत होते
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने केलेल्या तपासणीत असे आढळून आले की हे सर्व अॅप्स भारतीय वापरकर्त्यांचा डेटा चीन आणि इतर देशांना पाठवत होते. या अॅप्सच्या माध्यमातून युजर्सचा डेटा परदेशी सर्व्हरपर्यंतही पोहोचत होता. गुगलच्या प्ले स्टोअरसह अन्य प्लॅटफॉर्मवरून हे अॅप्स काढून टाकण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
यापूर्वी 59 चीनी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे
भारत सरकारने यापूर्वी 29 जून 2020 रोजी चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. 29 जून 2020 रोजी पहिला डिजिटल स्ट्राइक करताना 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. यानंतर 27 जुलै 2020 रोजी 47 अॅप्स, 2 डिसेंबर 2020 रोजी 118 आणि नोव्हेंबर 2020 रोजी 43 अॅप्सवर बंदी घालण्यात आली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या सर्व अॅप्सवर बंदी घातली आहे.
                                    
                                
                                
                              
