मुंबई : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीत आरक्षण द्यावे म्हणून संभाजीराजे यांनी राज्यात आंदोलन उभारले आहे; परंतु कोरोना संसर्गामुळे आंदोलनाची पुढील दिशा ठरविली नव्हती, तरीही मराठा आरक्षण
व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत सोमवारी मुंबईत आपली पुढील दिशा जाहीर केली आहे.
संभाजीराजे म्हणाले, "2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे, असे नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झाले. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली. मात्र, अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो. पण आता मी उद्विग्न झालो आहे. मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतू सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की, आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः आमरण उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे."
मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे. मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा, असे सांगितल. मात्र, खूप दिवसांनंतर याचिका दाखल करण्यात आली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे, हे काहीच माहिती नाही. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा, असे संभाजीराजे म्हणाले.
याचबरोबर, सर्व नेत्यांच्या दारी गेलो. मूक आंदोलन कोल्हापुरात केले. परंतू, या आंदोलनाने काहीच झाले नाही. मोजून पाच ते सहा मागण्या आहेत परंतू अजूनही मान्य होत नाहीत. सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचे असेल तर अपवादात्मक परिस्थीत असायला हवी. अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला पाहिजे, परंतु माझे म्हणणे आहे की टिकणारं आरक्षण द्या, असे संभाजीराजे यांनी सांगितले. दरम्यान, मराठा आरक्षण व समाजाच्या इतर अनुषंगिक मागण्याबाबत संभाजीराजे यांनी समाजातील सर्व क्षेत्रातील मुख्य घटकांशी विचारविनिमय केला आहे. या चर्चेतून त्यांनी आज आंदोलनासंदर्भात निर्णय घेतला आहे.