बीड-क्रिकेट जगतातील लोकप्रिय इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल मधील चेन्नई सुपर किंग्ज संघाने १.५० कोटी रुपयांमध्ये उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकरला खरेदी केलंय. त्यामुळे उस्मानाबादचा युवा गोलंदाज आता आयपीएल खेळताना दिसणार आहे. त्याला खरेद करण्यासाठी मुंबई इंडियन्स इच्छुक होती. पण अखेर चेन्नईने बाजी मारली. राजवर्धनच्या निवडीची जशी बातमी आली तसं संपूर्ण तुळजापूर आणि उस्मानाबादमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामासाठी बेंगलोर येथे आज दुसऱ्या दिवशी उर्वरित खेळाडुंसाठी लिलाव होता. १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धा भारताने नुकतीच जिंकली आहे. या संघात तुळजापुर येथील राजवर्धन हंगरगेकर याने चांगला खेळ दाखवला. त्याचं बक्षीस त्याला मिळालं आहे. चेन्नईने राजवर्धनवर बोली लावत त्याला दीड कोटी रुपयांना खरेदी केलंय.राजवर्धन हंगरगेकर हा तुळजापुर येथील माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा नातू असून उस्मानाबादून शिक्षण आणि क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी तो पुण्यात गेला. तिथे काही वर्ष त्याने मेहनत घेतली. भारतीय क्रिकेट संघात खेळायचं हे स्वप्न उराशी ठेवून राजवर्धनने ३ वर्ष घाम गाळला. कोविडच्या काळातही त्याने कसून सराव केला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राजवर्धन हंगरगेकर अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलु क्रिकेटर म्हणून खेळला. चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून राजवर्धनला संधी मिळतेय, म्हणुन तुळजापुर शहरात जल्लोष साजरा होत आहे.