बीड-बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या आणि किती तरी आंदोलनांचा साक्षीदार असलेल्या लिंबाच्या झाडाचा अखेर प्रशासनाने बळी दिला.मागच्या काही काळात अनेक आंदोलकांनी आंदोलक झाडावर चढून प्रशासनाची झोप उडवत असल्याचे समोर आल्यानंतर रविवारी प्रशासनाने हे झाडाचं तोडून टाकले. प्रशासनाची ही भूमिका म्हणजे घरात उंदीर घुसतो म्हणून घरच जाळून टाकण्याची असल्याची भावना यामुळे व्यक्त होत आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलक कट्ट्यावर एक अनेक वर्षांचे लिंबाचे झाड होते. जिल्हाभरातील आंदोलकांवर सावली धरण्याचे काम हे झाड करीत होते. मात्र स्टंटबाजीच्या नादात मागच्या काळात काही आंदोलकांनी आंदोलनासाठी या झाडाचा वापर करणे सुरु केले. आंदोलक झाडावर चढून बसू लागले आणि त्यांना उतरविताना प्रशासनाची त्रेधा उडू लागली होती. यावर उपाय म्हणून प्रशासनाने रविवारी सदरचे झाडच तोडून टाकले. एवढे जुने झाड तोडण्यास अनेकांनी विरोध करण्याचाही प्रयत्न केला,मात्र त्यांना थेट गुन्हे दाखल करू या शब्दात धमकावण्यात आले.
आंदोलक झाडावर चढतात म्हणून झाडच तोडण्याच्या प्रशासनाच्या अजब कृतीबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार करताना प्रशासनाने देखील आततायीपणा केला असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. घरात उंदीर घुसला तर घरच जाळण्याचा हा प्रकार असल्याचे लोक बोलत आहेत.
यापूर्वी तोडले नव्हते टॉवर
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या एका टॉवरवर चढून आंदोलन करण्याचे प्रकार काही वर्षांपूर्वी घडले होते. त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्या टॉवरला कुंपण घालण्याचा निर्णय घेतला होता, टॉवरच तोडले नव्हते. याची आठवण लोक करीत आहेत.
झाडालाही घालता आले असते कुंपण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर हे जे झाड होते, त्यावर आंदोलकांनी चढू नये म्हणून त्याला कुंपण घालता आले असते , मात्र त्याऐवजी प्रशासनाला झाडच झाली हा प्रश्नच आहे. आता उद्या कोणी एखाद्या इमारतीवर चढून आंदोलन केले तर प्रशासन ती इमारतही पडून टाकणार का ? का झाडाबद्दल कोणी विचारणारे नाही म्हणून चालते अशा भावना वृक्षप्रेमी व्यक्त करीत आहेत.