राळेगण सिद्धी-राज्य सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंनी प्राणांतिक उपोषण करणार होते. सोमवार १४ फेब्रुवारीपासून उपोषण करणार असल्याचं त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून कळवलं होतं. दरम्यान, आज राळेगण सिद्धीत माध्यमांशी बोलताना अण्णा हजारेंनी ग्रामसभेशी चर्चा करून नंतर उपोषणाबाबत निर्णय घेणार असं, सांगितलं होतं. या चर्चेनंतर त्यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
अण्णा हजारेंच्या आंदोलनासंदर्भात राळेगण सिद्धीत रविवारी (दि.१३) ग्रामसभा झाली. यावेळी अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. अण्णांच्या वयाचा विचार करून उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली. दिलेल्या वृत्तानुसार, ग्रामसभेत अण्णा हजारेंनी त्यांच्या वयाचा विचार करत प्राणांतिक उपोषण करू नये, अशी विनंती ग्रामस्थांनी केली. त्यामुळे अण्णांनी उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे.