बीड-बीड जिल्हा रुग्णालयात आरोग्यसेवा चांगल्या व्हाव्यात यासाठी सीएस डॉ. सुरेश साबळे यांचे प्रयत्न सुरु असतानाच आता त्यांनी कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. नेत्राचीकीत्सा विभागाचे काम असमाधानकारक असल्याचे सांगत बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी अतिरिक्त सीएस डॉ. सुखदेव राठोड यांच्यासह आणखी दोन डॉक्टरांच्या वेतनवाढी रोखल्या आहेत. अतिरिक्त सीएस दर्जाच्या अधिकाऱ्यावर असमाधानकारक कामामुळे कारवाई होण्याची कदाचित ही राज्यातील पहिली घटना असावी .
बीड जिल्हा रुग्णालयाला शिस्त लावण्यासाठी सीएस डॉ. सुरेश साबळे यांनी आता कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. वारंवार सूचना देऊनही कामाच्या पद्धतीत सुधारणा न करणाऱ्या डॉक्तरांवर कारवाई सुरु करण्यात आली असून याचा फटका थेट अतिरिक्त सीएस असलेल्या डॉ. सुखदेव राठोड यांनाच बसला आहे. मागच्या काही महिन्यात नेत्रचिकित्सा विभागाचे काम असमाधानकारक असल्याचे सांगत या विभागातील डॉ. सुखदेव राठोड, डॉ. नारायण आळणे , डॉ. रवींद्र गालफाडे या तिघांच्या वेतनवाढी रोखण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सुखदेव राठोड यांच्यासह इतरांवर अनेकदिवस एकही शस्त्रक्रिया न करणे तसेच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
बातमी शेअर करा