बंगळुरु: टाटा आयपीएल च्या 15 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन सुरु झालं आहे. सर्वप्रथम भारताचा आक्रमक डावखुरा फलंदाज शिखर धवनसाठी बोली लागली. धवनला किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतलं आहे. मार्की खेळाडूंच्या यादीने लिलावाला सुरुवात झाली आहे. धवला 8.25 कोटी रुपयांना किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतलं आहे. धवनची बेस प्राइस दोन कोटी रुपये होती. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये त्याने दमदार कामगिरी केली होती.
राजस्थान रॉयल्सने 5 कोटींच्या बोलीवर रवीचंद्रन अश्विनला आपल्या संघात घेतलं. अश्विन आणि जॉस बटलर यंदा एकाच संघाकडून खेळणार आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सने पॅट कमिन्सवर 7.25 कोटींची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. गेल्या वर्षी त्याच्यावर कोलकात्याने 15 कोटींची बोली लावली होती. कमिन्स आता पुन्हा एकदा कोलकात्याकडून खेळणार आहे.
9.25 कोटी रुपयांच्या बोलीवर पंजाब किंग्जने कगिसो रबाडाला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. पंजाबच्या पर्समध्ये सर्वाधिक 72 कोटी आहेत. त्यांनी तीनच खेळाडूंना रिटेन केलं आहे. पंजाबने आतापर्यंत दोन खेळाडू विकत घेतले आहे.
राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टवर सर्वात मोठी 8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला आपल्या संघात घेतलं. बोल्टवर मुंबईने 7.75 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र राजस्थानने अखेर मुंबईचा खेळाडू आपल्याकडे घेतला.
चार वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हे मेगा ऑक्शन होत आहे. यापूर्वी 2018 मध्ये असं मेगा ऑक्शन झालं होतं. जवळपास 600 खेळाडूंवर दोन दिवस बोली लागणार आहे. अनेक खेळाडूंवर या दोन दिवसात पैशांचा वर्षाव होईल. यावेळी आयपीएलमध्ये आठ ऐवजी दहा संघ आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ लिलावात आहेत.