Advertisement

वक्फ जमीन घोटाळ्यातील आरोपींचा जामीन फेटाळला

प्रजापत्र | Friday, 11/02/2022
बातमी शेअर करा

बीड-राज्यभर गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील वक्फ जमीन घोटाळा प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलिसात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्यासह इतर आरोपींचा जामीन अर्ज बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावसह महसुलाचे अनेक कर्मचारी आणि भूमाफिया आरोपी आहेत.
      बीडच्या शिवाजीनगर पोलीस थानायत वक्फ जमीन गैरव्यवहार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील वक्फच्या शेकडो एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात भूमाफियांसह महसुलाचे अधिकारी, कर्मचारी देखील आरोपी आहेत.

 


 

यातील उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव (पाटील) यांच्यासह हबीबोद्दीन सिद्दकी,उद्धव हिंदोळे,पुरुषोत्तम आंधळे,परमेश्वर राख,शेज अश्फाक शेख गौसपाशा , वसंत मंडलिक आदींनी अटकपूर्व जामिनासाठी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
न्या. के.आर.पाटील यांच्यासमोर या प्रकरणात सुनावणी झाली,सुनावणीअंती सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन  अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. यामुळे आता आरोपींच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

 

खरेदीदारांना देखील नाही दिलासा
या प्रकरणात वक्फच्या जमिनी ज्यांनी खरेदी केल्या त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे. आरोपी करण्यात आलेल्या काही खरेदीदारांनी  देखील अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. 'आम्ही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाहून जमिनी खरेदी केल्या आहेत ' असा युक्तिवाद त्यांच्यावतीने करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने त्यांनाही दिलासा दिला नसून त्यांच्याही जामीन फेटाळण्यात आल्या आहेत.

 

Advertisement

Advertisement