मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द करा या मागणीसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर केलेल्या आंदोलनामुळं खळबळ उडाली होती. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी हिंदूस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला पोलिसांनी अटक केली आहे. हिंदूस्थानी भाऊ सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं होतं. मात्र, हे होऊनही काही यूट्यूब चॅनेल्सवरुन दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याचे व्हिडीओ शेअर करुन संभ्रम निर्माण केला जात आहे. विविध व्हाटसअप ग्रुपवर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओचं सत्य नेमकं काय आहे, जाणुन घेऊया.
जाहिरात
कोरोनाग्रस्तांचा सारथी: विजयसिंह (बाळा) बांगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
शुभेच्छुक-विजयसिंह (बाळा) बांगर मित्र मंडळ
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतील दावा
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी असं म्हणत विविध व्हिडीओ चॅनेल्स व्हिडीओ एडिट करुन दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचं दाखवण्यात येतंय. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्याचा दावा करण्यात येतोय. व्हिडीओत करण्यात असलेला दावा हा चुकीचा आहे.
व्हिडीओमागील सत्य काय?
गेल्या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळं प्रथम परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर, त्यानंतर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी विविध माध्यमांकडून करण्यात आलेल्या वृत्तांकनातील व्हिडीओ क्लिपशी छेडछाड करुन संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील.दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत, असं बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी 3 फेब्रुवारी रोजी सांगितलेलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचा व्हायरल व्हिडीओ तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही त्यावर विश्वास ठेऊ नका.