हिजाबच्या प्रश्नावरून सध्या कर्नाटकात जे काही सुरु आहे ते देशाच्या प्रतिमेला आणि विविधेतेच्या परंपरेला शोभणारे नक्कीच नाही. मुळात देशात ज्या ज्यावेळी कोणत्याही राज्यात निवडणुका असतात, त्या त्यावेळी भाजपशासित राज्यांमधून धार्मिक विद्वेष आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे समोर आणले जातात हा आजवरचा इतिहास आहे. यावेळी उत्तरप्रदेशात भाजपने कितीही प्रयत्न केले तरी धार्मिक ध्रुवीकरणाला म्हणावे तितके यश येत नसल्याचे चित्र आहे. अगदी ओवेसी हल्ला प्रकरणानंतरही उत्तरप्रदेशच्या निवडणुकीला धार्मिक रंग देण्यात भाजपला फारसे यश येत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळेच आता भाजपशासित राज्यांमधून धार्मिक विदेशाची बीजे पेरता येतात का हे पहिले जात असावे.देशात ज्या-ज्यावेळी धार्मिक वाद आणि दंगली झाल्या त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपलाच फायदा झाला हा इतिहास आहे. त्यामुळेच हिजाबचं प्रकरण आताच समोर आणले जाण्याच्या विषयावरून प्रश्न निर्माण होत आहेत.
भाजपची भूमिका काहीही असेल, मात्र या विषयावरून एका विद्यार्थिनीला महाविद्यालयात घरात एक मोठा जमाव जय-श्रीरामची नारेबाजी करतो हेच धक्कादायक आहे. ज्या रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते, त्या रामाच्या चरित्रात किंवा विचारात हा असला उडाणटप्पूपणा कुठे बसतो ? ज्या हिंदू धर्माची ग्वाही हे टगे देत आहेत, त्यांना हिंदू किंवा भारतीय तत्वज्ञान तरी कळले आहे का ? एका महिलेची राजदरबारात बेअब्रू झाली म्हणून महाभारताचे युद्ध झाल्याचा आणि हे युद्ध 'धर्म संस्थापनार्थाय असल्याचे तत्वज्ञान सांगणारा हिंदू धर्म आहे, मग अशावेळी एका विद्यार्थिनीला टार्गेट करणारे 'टारगट' लोक हिंदुत्वाची ओळख कशी होऊ शकतात ? याचा सरळ सरळ अर्थ इतकाच आहे की आता असल्या टग्यांना हाताशी धरून या देशातील धार्मिक वातावरण कोणाला तरी बिघडवायचे आहे. आणि असे वातावरण कोणाला बिघडवायचे असते हे आजवरच्या इतिहासातून वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
मुळात शाळा महाविद्यालयात मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब घालायला सुरुवात काही आता अचानक केलेली नाही. वर्षानुवर्षे विद्यार्थिनी हिजाब वापरतात. ते योग्य कि अयोग्य ? शाळा महाविद्यालयात गणवेश आवश्यक असताना असे करता येते का ? यावर चर्चा होऊ शकते. 'पहले हिजाब, फिर 'किताब ' हा आक्रस्ताळेपणा देखील कितपत योग्य आहे यावर देखील चर्चा करता येऊ शकते. हिजाबच्या विषयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले होते, त्यात सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, मग न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच असला दांडगटपणा का केला जात आहे ? महाविद्यालयात विद्यार्थिनीने हिजाब घातलेला चालत नाही, मात्र धार्मिक झेंडे घेऊन धुडगूस घालता येतो हा प्रकार कोणत्या कायद्यात बसतो ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.
मागच्या काही वर्षात धर्माच्या नावावरची दांडगाई आणि टगेगिरी वाढीस लागत आहे. कट्टरपंथी, मग ते कोणत्याही धर्मातील असोत, कट्टरतावाद हा शेवटी समाजाला विनाशाच्या दिशेनेच नेणारा असतो , याची जाणीव सत्ताधाऱ्यांनी ठेवायची असते. कट्टरतावादामुळे सत्ता मिळेल, मात्र नंतर हेच कट्टरतावादी भस्मासुर कसे बनतात हे अफगाणिस्तानसह अनेक देशांमध्ये अनुभवायला मिळाले आहे. आता आपल्याला विविधता असलेल्या भारताला देखील तसल्याच आगीत ढकलायचे आहे का ? निवडणुकांच्या राजकारणासाठी मानवी आयुष्याच्या होळ्या पेटविल्याशिवाय जमणारच नाही का ? तात्कालिक फायद्यासाठी देशाला विनाशाकडे ढकलणाऱ्या प्रवृत्तीला आवार घालणे महत्वाचे आहे. हे रोखावेच लागेल. हा उन्माद कोणाचेच भले करणार नाही, तर सामान्यांच्या आयुष्याची राख करेल हेही लक्षात घ्यावे लागेल. असला उन्माद निर्माण करून निवडणुका जिंकता येतीलही, पण देशाला, समाजाला आपण कोणत्या वळणावर नेऊन ठेवीत आहोत आहोत किती वर्षे मागे नेट आहोत याचा विचार सत्ता करणार आहे का नाही ?
बातमी शेअर करा