Advertisement

दिल्लीत चाललेय काय?

प्रजापत्र | Wednesday, 09/02/2022
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची स्तुती केलेली असताना राजधानी दिल्लीतून बुधवारी (दि.९) दोन फोटो आले आहेत. यामध्ये शरद पवारांचा नातू आणि आमदार रोहित पवार यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. त्याच्या काही तास आधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची भेट घेतली आहे. दानवेंसोबतच्या बैठकीवेळी शरद पवार देखील होते. या दोन फोटोंमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधान आले आहे.

 

          रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पदानंतर केंद्रात मोठे मंत्रीपद मिळाले आहे. यामुळे त्यांच्या या मंत्रीपदाचा फायदा पुणे-नाशिकसाठी व्हावा यासाठी शरद पवार, रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी दानवेंची भेट घेतली. पुणे - नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी ही बैठक झाली. याबाबतचे फोटो खासदार अमोल कोल्हे यांनी पोस्ट केला आहे.

 

          यानंतर रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेतली. मतदारसंघात राष्ट्रीय बँकांचे जाळे वाढविण्यासाठी पवार यांनी पूर्वी भेट घेतली होती. आता यामध्ये State Level Banking Committee (SLBC) अंतर्गत या सुविधांसाठी मान्यता द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. यानंतरच्या भेटीची चर्चा राज्यात रंगली आहे. रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. मतदारसंघातील बारा बलुतेदार व पारंपरिक हस्त कारागिरांसाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात खर्डा, जवळा किंवा नान्नजमध्ये मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी पवार यांनी केली. मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरू झाल्यास ते तयार करत असलेल्या वस्तुंना चालना मिळेल आणि हक्काची बाजारपेठही उपलब्ध होईल, असे पवार यांनी नारायण राणे यांना सांगितले.

Advertisement

Advertisement