महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राज्यभरातून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आता राज्यसरकार विरोधात आमरण उपोषणाची हाक दिली आहे. त्याबाबत आज अण्णांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक स्मरण पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी राज्य सरकारने घेतला वाईनचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी अण्णांनी सरकारला 14 फेब्रुवारीपर्यंत कालावधी दिला आहे.
अण्णा हजारे यांनी तीन फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देत या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्या पत्राचे कोणतेही उत्तर राज्य सरकारने दिले नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्याची आठवण करुन देण्यासाठी अण्णांनी पुन्हा एकदा स्मरण पत्र लिहले आहे. राज्यात किराणा दुकानात वाईन प्रकरणात अजित पवार यांना देखील आपण पत्र पाठवले असल्याचे अण्णा म्हणाले. मात्र त्यांचे देखील कोणतेही उत्तर प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अण्णाने पुन्हा एकदा पत्र लिहत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
हा निर्णय चुकीचा-अण्णा
राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, व्यसनमुक्तीसाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवे मात्र येथे सरकारच लोकांना व्यसन लावण्याचे काम करत आहे. महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय हा चुकीचा असून, मी त्याचा विरोध करतो, असे अण्णा हजारे म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारने मागील महिन्यात किराणा दुकान आणि मॉलमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. त्याला राज्यभरातून विरोध होत आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देण्यामागचे कारण असे की, सध्या राज्यात फळे, फुले आणि मधापासून वाईन बनवली जात आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील छोट्या वाईन कंपन्या आणि शेतकऱ्यांना होणार आहे.