Advertisement

अखेर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात

प्रजापत्र | Monday, 07/02/2022
बातमी शेअर करा

गेवराई : प्रतिनिधी तालुक्यातील शहाजानपूर येथील चार मुलांचा सिंदफना नदीतील वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली होती. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. तर ग्रामस्थांनी जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यातच सुरुवातीला घटना नदीच्या मधोमध घडल्याने बीड व गेवराई प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवल्याने मध्यरात्रीपर्यंत चारही मुलांचे मृतदेह नदीपात्रात पडून होते. यानंतर बीड-गेवराई महसूल विभागातील अधिकारी घटनास्थळी येऊन त्यांनी संयुक्तरित्या दोषींवर कारवाई तसेच मयतांच्या कुटूंबांना विनाविलंब मदत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रात्री दोन वाजता ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतले.

हि दुर्दैवी घटना नदीच्या मधोमध घडल्याने सुरुवातीला बीड व गेवराई प्रशासनाने एकमेकांकडे बोट केले होते. दरम्यान रात्री उशिरा गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे, बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके, गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, गेवराईचे सपोनि संदिप काळे व बीड ग्रामीणचे सपोनि योगेश उबाळे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या दोषींवर ठोस कारवाई करणार, यापुढे याठिकाणाहून वाळू उपसा होणार नाही व ग्रामस्थांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, शासकीय नियमानुसार मयतांच्या कुटूंबांना मदत व आर्थिक सहाय्य देण्याबाबत विनाविलंब कारवाई करण्यात येईल आदी लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी मुलांचे मृतदेह ताब्यात घेतले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वाळू माफियांच्या वाळू उपश्याने चार चिमुकल्या मुलांचा बळी घेतला आहे. खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा वाळू उपसा केलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना बीडच्या गेवराई तालुक्यात असणाऱ्या शहाजनपुर चकला या गावातील सिंदफणा नदी पात्रात, सातच्या दरम्यान घडली असून रात्री साडे आठ ते नऊच्या दरम्यान उघडकीस आली आहे.बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर अशी मृत मुलांची नावे असून ही सर्व मुले 9 ते 13 वयोगटातील आहेत.

दरम्यान या घटनेने मोठी खळबळ उडाली असून सध्या सिंदफना नदी पात्रात शेकडो नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. घटनास्थळी नागरिक आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी येऊन वाळू माफियांविरोधात ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळं घटनास्थळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

Advertisement