मुंबई: राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रीय अर्थसंकल्पातील शिक्षणाविषयीची तरतूद आणि पहिली दुसरीचा अभ्यासक्रम यावर भाष्य केलं. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं. दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना आवाहन आहे की आपण अभ्यासावर लक्ष केंद्रीत कराव, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद घेणार आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन शिक्षण धोरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.
विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी ऑनलाईन परीक्षांसाठी आंदोलन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना वर्षा गायकवाड यांनी अभ्यास करण्याचं आवाहन केलं. दहावी बारावीच्या परीक्षांसदर्भात आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहोत. बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दृष्टीनं काम करण्यात येत आहे. बोर्डाकडून अधिक माहिती मिळेल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरणासाठी निधी नाही
शिक्षण आणि आरोग्य लोकांचे मुलभूत अधिकार आहेत. अभ्यासक्रम आणि सुविधा चांगल्या असतील तर देशाचा विकास होईल. केंद्रानं अर्थसंकल्पात अनेक गोष्टी आहेत, आदर्श शाळा अशा सारख्या गोष्टी आपण अगोदरचं केल्या आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भात निधीबाबत तरतूद अर्थसंकल्पात पाहायला मिळाली नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
प्राथमिक शाळांचा दर्जा उंचावणार
वर्षा गायकवाड यांनी मुंबईत महापालिकेकडून काही ठिकाणी पब्लिक स्कुल, इंटरनॅशनल स्कुल आणि सीबीएसई शाळा सुरु करण्यात आल्याचं सांगितलं. त्याप्रमाणेच प्राथमिक शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं. आम्ही सध्या पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदल आहोत. पहिलीचं पुस्तक हे दोन भाषांमध्ये असेल. आणि दुसरीचं पुस्तक हे आदर्श शाळांना देणार आहोत, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.