लखनौ - राज्यातील ५ विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला काही जिल्ह्यांत आता लवकरच ब्रेक लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 10 फेब्रुवारी रोजी सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चांगलंच राजकारण पाहायला मिळत आहे. विशेषत: उत्तर प्रदेशात फोडाफोडीचं आणि जोडाजोडीचं राजकारण होत आहे. सपाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादवांची सून अपर्णा यादवांना यादव कुटुंबापासून फोडण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपाने त्यांना उमेदवारी दिलीच नाही. तर, रिटा बहुगुणा यांच्या मुलाचंही तिकीट कापण्यात आलं आहे.विशेष म्हणजे ईडीच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर मंगळवारी भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भाजपने लखनौसाठी 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये, ईडीमधील माजी अधिकाऱ्याला तिकीट दिलं आहे. ईडीतील माजी सहआयुक्त राजेश्वर सिंह यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. लखनौच्या सरोजनी नगर विधानसभा मतदारसंघातून राजेश्वर सिंह यांना तिकीट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सोमवारीच सिंह यांची स्वेच्छानिवृत्ती केंद्र सरकारने स्विकारल्याचं ट्विट त्यांनी स्वत: केलं होतं. सन 2007 मध्ये ते अंमलबजावणी संचानालय म्हणजे ईडीमध्ये कार्यरत झाले होते. तत्पूर्वी त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनात 10 पोलीस खात्यात काम केलं असून 14 वर्षे ते ईडी विभागात कार्यरत होते.