नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने एका वृद्ध महिलेला तिचा अधिकार मिळवून दिला आहे. मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने आईसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या मुलाला घर सोडण्याचे आदेश दिले आहेत. महिलेची मालमत्ता रिकामी करण्यासाठी मुलगा आणि सुनेला दिल्ली उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मालमत्ता रिकामी करण्याच्या आदेशाविरोधात मुलगा आणि सुनेने दाखल केलेली याचिका फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांनी 73 वर्षीय महिलेचा मुलगा आणि सुनेला 15 फेब्रुवारीपूर्वी तीन आठवड्यांच्या आत मालमत्ता रिकामी करण्याचे निर्देश देणारी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याच्या मुलांची परीक्षा सुरू असल्याने न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला आहे.
मालमत्ता हडप करण्यासाठी आईचा छळ
या वृद्ध महिलेचे नाव अंगूरदेवी असे आहे. न्यायालयाने पुढे सांगितले की, लग्नानंतर याचिकाकर्त्यांनी तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. तसेच मालमत्ता हडप करण्यासाठी प्रत्येक वेळी तिच्यावर दबाव आणला. त्यांनी तिन्ही मालमत्ता ताब्यात घेतल्या, आईला मालमत्तेतून बाहेर फेकून दिले.
उच्च न्यायालयाने फेटाळली दाम्पत्याची याचिका
25 जानेवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दाम्पत्याची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेमध्ये न्यायालयाच्या आधीच्या आदेशााल आव्हान देण्यात आले होते. 10 जानेवारी 2022 रोजी न्यायालयाने मालमत्त ताब्यात घेण्याच्या वॉरंटला आव्हान देण्यात आले होते. खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्ता आणि त्याच्या पत्नीने या आदेशाविरुद्ध 2 ऑगस्ट 2021 रोजी विभागीय आयुक्त अपील प्राधिकरणाकडे अपील केले होते जे फेटाळण्यात आले होते. न्यायालयाने सांगितले की, 28 ऑक्टोबर 2021 रोजी विभागीय आयुक्तांनी ऑगस्ट 2021 च्या आदेशाला स्थगिती देण्याची जिल्हा दंडाधिकाऱ्यांची विनंती फेटाळली होती.
मालमत्तेवर आईचीच मालकी
त्याचवेळी, याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटले आहे की, महिलेच्या सुनेने मालमत्तेत कायमस्वरूपी हिस्सा मिळावा म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. सूनेचे म्हणणे आहे की मीही मालमत्तेची भागधारक आहे. यावर जिल्हा दंडाधिकार्यांच्या आदेशाचा संदर्भ देत न्यायालयाने सांगितले की, असे आढळून आले आहे की याचिकाकर्त्या आईचे वय 73 वर्षे असून ती मालमत्तेची पूर्ण मालकीण आहे. ही मालमत्ता 1998 मध्ये प्रतिवादीचे वडील जय राम सिंह आणि आई अंगूरी देवी यांनी मिळून खरेदी केली होती. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.