नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे आधीच डागाळलेल्या दिल्लीमध्ये आता आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी दिल्लीमधील कस्तुरबानगर येथे एका 20 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्कार झाल्यानंतर या तरुणीची तेथील महिलांनीच केस कापून धिंड काढली आहे. अवैध दारुची विक्री करणाऱ्यांनी या तरुणीवर बलात्कार केल्याचे म्हटले जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा प्रकार घडल्याचे आता समोर आले आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेचे केस कापून तिची धंड काढल्याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
महिलांनी बलात्कार पीडित तरुणीची धिंड काढली
मिळालेल्या माहितीनुसार कस्तुरबा नगर परिसरात एका 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. अवैध दारु विक्री करणाऱ्या लोकांकडूनच तरुणीवर हा अत्याचार करण्यात आला. बलात्कार झाल्यानंतर कस्तुरबा नगरमधील महिलांनी पीडित तरुणीची धिंड काढली. डोक्यावरचे केस कापून या तरुणीला रस्त्यावर फिरवण्यात आले. तसेच बाकीच्या महिला पीडितेला धक्काबुक्की करत असल्याचेही दिसत आहे. पीडित तरुणीची धिंड काढल्याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे.
महिला आयोगाने घेतली गंभीर दखल
दरम्यान, महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी पीडित तरुणीची भेट घेतली आहे. तसेच या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय कारवाई केली याची विचारणा करण्यासाठी त्यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली आहे. तर दुसरीकडे हा प्रकार घडल्यानंतर पीडित तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत. प्रजासत्ताक दिनीच हा अमानुष प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.