केज दि.२५ – उसाने भरलेल्या ट्रॅक्टरखाली चिरडून दुसऱ्या ट्रॅक्टरच्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखान्यावर घडली. शिवाजी भिवाजी पौळ ( वय २८ ) असे या मरण पावलेल्या चालकाचे नाव असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालक राजेश अच्युतराव गुळभिले याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील बोरीसावरगाव येथील शिवाजी भिवाजी पौळ ( वय २८ ) हे आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरवर चालक म्हणून कामाला होते. २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये ऊस भरून खाली करण्यासाठी कारखान्यावर गेले होते. वाहनांची रांग असल्याने ट्रॅक्टर बंद करून खाली उतरले असता दुसऱ्या ऊस भरून आलेल्या ट्रॅक्टरचे ( एम. एच. ४४ एस ५६६९ ) चालक राजेश अच्युतराव गुळभिले ( रा. दीपेवडगाव ता. केज ) यांच्या निष्काळजीपणामुळे ट्रॅक्टरची धडक शिवाजी पौळ यांना बसल्याने खाली पडले आणि ट्रॅक्टरचे मोठे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने शिवाजी भिवाजी पौळ ( वय २८ ) हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशी फिर्याद मयताची पत्नी प्रीती शिवाजी पौळ यांनी दिल्यावरून ट्रॅक्टर चालक राजेश गुळभिले याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात २४ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक अंगद पिंपळे हे पुढील तपास करत आहेत.