बीड दि.२३ (प्रतिनिधी)-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी पायी तिरुपती येथे जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं होतं. एकनाथ शिंदे यांनी या शिवसैनिकाच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून सुमंत रुईकर यांच्या घराचं रविवारी (दि.२३) भूमीपूजन करण्यात आलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर आणि त्यांचा एक मित्र यांनी बीड ते तिरुपती बालाजी पायी यात्रा केली होती. कर्नाटकमध्ये पोहोचल्यानंतर रुईकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने रुईकर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्याने रुईकर कुटुंबीय एकाकी पडले होते; मात्र शिवसेना कडवट शिवसैनिक सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली.सुमंत रुईकर यांच्या कुटुंबियांच्या बीड येथील धोंडीपुरा, सराफा रोड भागातील घराचे भूमिपूजन आज रविवारी (दि.२३) शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाइन उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी बीड जिल्हा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज रविवारी (दि.२३) दुपारी दीड वाजता सुमंत रुईकर यांच्या घराचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.
शिवसेना कायम रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी-मंत्री एकनाथ शिंदे
याप्रसंगी रूईकर कुटुंबियांशी संवाद साधताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना कायम तुमच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. यापुढे कोणतीही अडचण आली तरी शिवसेनेशी संपर्क साधा, आम्ही कायम तुमचे भाऊ म्हणून पाठीशी असू असा शब्दही त्यांनी दिला .तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना ही रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी कायम राहण्याचा सूचना मंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिल्या. या घराचे भूमिपूजन जितक्या तत्परतेने झाले त्याच पद्धतीने आता या घराचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे असे आवाहनही मंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.