Advertisement

9 हजार 800 शेतकर्‍यांनी फिरविली कर्जमाफीकडे पाठ

प्रजापत्र | Thursday, 08/10/2020
बातमी शेअर करा

बीड  : राज्यभरात शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आपले नाव यावे यासाठी  शेतकरी धडपडत असताना बीड जिल्ह्यात मात्र कर्जमाफीच्या यादीकडे शेतकरीच पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. कर्जमाफीच्या यादीत नाव येऊन देखील जिल्ह्यातील 9 हजार 800 शेतकर्‍यांनी अजूनही आधार प्रमाणिकरण करुन कर्जमाफीचा लाभ घेतलेला नाही. त्यामुळे आता या यादीतील किती शेतकर्‍यांनी खरोखर कर्ज घेतले आहे आणि यातील काही खाती बोगस आहेत का हा प्रश्‍न निर्माण होत आहे.
ठाकरे सरकारने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर ज्या शेतकर्‍यांची नावे कर्जमाफीच्या यादीत येतील त्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन आपल्या नावासमोरील कर्ज आपल्याला मान्य आहे असे प्रमाणित करायचे आहे. त्यासाठी आपल्या अंगठ्याचे ठसे आणि आधार क्रमांक तेथे द्यायचा असून हे प्रमाणीकरण झाल्यानंतरच शेतकर्‍याला प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मात्र बीड जिल्ह्यात अजूनही तब्बल 9 हजार 800 शेतकर्‍यांनी यादीत नाव आलेले असतानाही आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यामुळे त्या शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. 
मिळालेल्या माहितीनूसार अनेक ठिकाणी कर्जमाफीच्या योजनेत काही बनावट खाती घूसविण्यात आली आहेत. तर काही शेतकर्‍यांना आपल्या नावे कर्ज आहे याचीच माहिती नाही यामुळे देखील अनेकजण कर्जमाफीच्या योजनेकडे फिरकले नसल्याचे विश्‍वसनीय सुत्रांनी सांगितले. एकीकडे यादीत नाव यावे यासाठी सर्व धडपडत असताना बीड सारख्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आधार प्रमाणिकरण करणार नसतील तर त्याची खरी कारणे काय आहेत याचा शोध घेण्याची गरज आहे. 

 

Advertisement

Advertisement