विजयसिंह बांगर यांच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक
बीड दि.७ (प्रतिनिधी)-गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले भायाळा गावाचे सरपंच विजयसिंह बांगर यांनी निधी व्यक्तिरिक्त पैसे खर्च करून गावाच्या दळवळणाचा प्रश्न निकाली काढला आहे.त्यांच्या कार्यामुळे रहदारीचा प्रश्न मिटला असल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत कौतुक केले.
भायाळा ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट काँक्रेट रोड कामासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण मार्फत साडे तीन लाख निधी मिळाला होता.या निधीतून त्यांनी गावाच्या विकासासाठी भर घातली.गावाचा प्रमुख रस्ता व्यवस्थित नसल्याने ग्रामस्थांच्या दळवळणाचा प्रश्न बिकट बनला होता.त्या पार्श्वभूमीवर सरपंच विजयसिंह बांगर यांनी सिमेंट काँक्रेट रस्ता करून १० लाख ७० हजारांचा खर्च करत दर्जेदार रस्ता बनविला.यासाठी त्यांनी ७ लाखांपेक्षा अधिक रक्कम स्वतःच्या खिशातून खर्च करून रहदारीचा प्रश्न निकाली काढला आहे.विशेष म्हणजे असा रस्ता करणारी पाटोदा तालुक्यातील भायाळा ग्रामपंचायत हे पहिली ठरली आहे.दरम्यान बांगर यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचे आभार मानत कौतुक करण्यात येत आहे.
ग्रामस्थांचे हित जोपासणे हे माझे कर्तव्य
गावाच्या प्रमुख मार्गाची वाताहत झाल्याने शेतकऱ्यांना या मार्गावरून आपल्या मालाची ने-आण करणे कठीण बनले होते.त्यामुळे शासन निधीची वाट न पाहता पदराचे ७ लाख खर्च करून गावाचा पक्का रस्ता बनविला.सरपंच म्हणून गावकऱ्यांचे हित जोपासणे हेच माझे आद्य कर्तव्य आहे ती मी निष्ठेने निभावत आलो आहे आणि निभावणारही.
विजयसिंह बांगर (सरपंच भायाळा)