केज दि.१५ -तालुक्यातील मस्साजोग येथील गुत्तेदार प्रकाश देशमुख यांचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केज शिवारातील चिंचपूर मारुती मंदिर परिसरात शनिवारी सकाळी उघडकीस आली.
मस्साजोग येथील गुत्तेदार प्रकाश हरिदास देशमुख ( वय ६० ) हे कुटुंबियांसह केज शहरात बीड रोडवरील जोशी हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होते. १४ जानेवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास प्रकाश देशमुख हे घरातून बाहेर पडले होते. त्यांनी घरातून जाताना घरी मोबाईल व एक चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीवर चिंचपूर मारुतीच्या दर्शनासाठी जात असल्याचे नमूद करून ते रिक्षाने मारुती मंदिराकडे गेले. मात्र त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी नातेवाईकांच्या लवकर निदर्शनास न पडल्याने व ते घरी परत न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा इतरत्र शोध घेतला. दरम्यान, चिंचपूर मारुती परिसरातील शेततळ्यात डोकावून बघत असताना त्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेततळ्यात पाण्यावर तरंगत असताना निदर्शनास आला. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस नाईक मंगेश भोले यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मस्साजोग येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुदर्शन चंद्रशेखर देशमुख यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.