Advertisement

प्रविण दरेकरांचे 'शिवसंग्रामपे करम' ठरलं स्थानिक 'भाजप पे सितम'

प्रजापत्र | Tuesday, 06/10/2020
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या दौर्‍यात राजकीय ‘अतिप्रेमाचे’ दर्शन घडले. शिवसंग्राम राज्यात भाजपसोबत असला तरी बीड जिल्ह्यात मात्र शिवसंग्राम आणि भाजपमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते आहे. हे माहित असतानाही विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सोमवारी नियोजीत कार्यक्रमात बदल करत आपला ताफा वळवून शिवसंग्राम कार्यालयात सत्कार स्विकारला. दरेकरांचा हा ‘गैरो पे करम’ चा प्रकार भाजपवाल्यांना ‘ऐ जाने वफा ये जुल्म ना कर’ या गाण्याची आठवण करून देणारा ठरला.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे तसे फडणवीसांचे चाहते आणि शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे हे देखील फडणवीसांचे मित्र. प्रविण दरेकर बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असले तरी स्थानिक भाजपला या दौर्‍याचे फारसे कौतुक मुळातच नव्हते. केवळ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत म्हणून भाजपवाले औपचारीकता म्हणून त्यांच्यासोबत दिसत होते. मात्र या दौर्‍यालाही पुन्हा राजकीय रंग चढला. प्रविण दरेकर केतुरा येथे भेटीसाठी निघाले असता आ.विनायक मेटे यांनी त्यांना फोन केला आणि केतुर्‍याकडे निघालेला दरेकरांचा ताफा अचानक वळत थेट शिवसंग्राम कार्यालयात पोहचला. यामुळे भाजपवाल्यांची चांगलीच गोची झाली. दरेकरांनी मात्र शिवसंग्राम कार्यालयात सत्कार स्विकारत आ.विनायक मेटे यांच्याशी चर्चाही केली. इतकेच नव्हे तर आ. मेटे दरेकरांसोबत पाहणी दौऱ्यात देखील सहभागी झाले. भाजपच्या गावागावातील कार्यकर्त्यांनी आ. मेटेंचे स्वागत केले. विधानसभेपुर्वीच्या  महाजनादेश यात्रेत जे घडले होते काहीसा तसाच प्रकार दरेकरांच्या दौर्‍यातही घडल्यामुळे स्थानिक भाजपला मात्र ‘ऐ जाने वफा ये जुल्म ना कर, गैरो पे करम, अपनो पे सितम’ हे गाणे आठवले नसते तरच नवल.

Advertisement

Advertisement