Advertisement

करोना लसीचे ११ डोस घेणाऱ्या ‘त्या’ आजोबांविरोधात अटक वॉरंट जारी

प्रजापत्र | Sunday, 09/01/2022
बातमी शेअर करा

करोना विषाणूच्या संसर्गावर सर्वात प्रभावी उपाय म्हणून सध्या करोना लसीकडे पाहिलं जातंय. अशातच देशभरात करोना लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र, यात अनेकजण अजूनही करोना लस घेण्यास धजावत नाहीयेत. यामागे लसीविषयीच्या अफवा आणि गैरसमजही कारणीभूत आहेत. मात्र, बिहारमध्ये एका आजोबांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल ११ वेळा करोना लसीचे डोस घेतल्याचं समोर आलं आणि देशभरात त्यांची चर्चा झाली. आता याच ८४ वर्षीय आजोबांविरोधात अटक वॉरंट निघालं आहे. यामागे नेमकं काय कारण आहे? चला समजून घेऊयात.

 

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील उदकिशुनगंज उपविभागांतर्गत पुरैनी पोलीस स्टेशनच्या ओराई गावातील रहिवासी ब्रह्मदेव मंडल यांना करोना लसीचा तब्बल १२ वा डोस घेण्यासाठी आले असताना पकडण्यात आले. चौकशी केली असता या आजोबांनी स्वतःच आतापर्यंत ११ लसीचे डोस घेतल्याचं सांगितलं. ब्रम्हदेव मंडल यांनी लसीचे इतके डोस कसे घेतले हे शोधण्यासाठी आता या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणी मधेपुरा जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल झालाय. त्यामुळेच या आजोबांविरोधात अटक वॉरंट निघालं आहे.

 

करोना लसीचे इतके डोस का घेतले?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लस घेणाऱ्या ब्रह्मदेव मंडल या आजोबांनी सांगितले की करोना लस घेतल्यानंतर त्यांना असलेल्या एका गंभीर आजाराचा त्रास कमी झाला. यानंतर आजोबांनी हा आजार बरा व्हावा म्हणून करोना लसीचे डोस घेण्याचा सपाटाच लावला. त्यांनी ११ डोस घेतले आणि १२ व्या डोससाठी पुन्हा लसीकरण केंद्रावर आले. यासाठी त्यांनी आपलं आधार कार्ड, मतदान कार्ड याचा वापर केला. मात्र, १२ व्या वेळी आजोबांचा हा प्रकार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांचं बिंग फुटलं.

 

 

११ वेळा लस घेणारे आजोबा टपाल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी
हे आजोबा टपाल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी पहिला लसीचा डोस घेतला. त्यानंतर १३ फेब्रुवारी ते ३० डिसेंबर दरम्यान त्यांनी सार्वजनिक आरोग्य केंद्रात ११ डोस घेतले. त्‍यांनी लसीचे ठिकाण, तारीख आणि वेळ देखील लिहून ठेवली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा आणि व्यवस्थेतील त्रुटी देखील उघड झाल्या आहेत.

Advertisement

Advertisement