लातूर : सोयाबीनचे दर कवडीमोल असताना ज्या शेतकऱ्यांनी (Soybean सोयाबीनची साठवणूक केली ते आज मालामाल होत आहेत. दिवाळीपूर्वी सोयाबीनला 4 हजार 200 रुपयांचा दर होता. मात्र, भविष्यात दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी केलेली साठवणूक आज कामी येत आहेत. सोयाबीनला 6 हजार 400 चा दर मिळत आहे. नववर्षापासून सोयाबीनचे दर वाढलेच नाहीत तर ते स्थिरही झाले आहेत. दराबाबत शेतकऱ्यांना शाश्वती आल्यानेच आता साठवणूकीतले सोयाबीन बाजारपेठेत दिसत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची दुपटीने वाढ झाली आहे. शुक्रवारी सोयाबीनला 6 हजार 400 चा दर होता तर आवक ही 18 पोत्यांची झाली होती. शेतकऱ्यांना अजूनही वाढीव दराची अपेक्षा आहे. मात्र, आगामी काळात उन्हाळी सोयाबीनची आवक होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची केलेली विक्रीच फायदेशीर राहणार आहे.
अजूनही शेतकऱ्यांना वाढीव दराचीच अपेक्षा
दिवाळीपूर्वी 4 हजारावर असलेले सोयाबीन आता 6 हजार 400 वर गेले असतनाही शेतकऱ्यांना वाढीव दराचीच अपेक्षा आहे. मात्र, मध्यंतरी दरात झालेली घसरण आणि भविष्यात उन्हाळी सोयाबीनची होणारी आवक यामुळे शेतकरी टप्प्याटप्प्याने का होईना साठवणूक केलेल्या सोयाबीनची विक्री करु लागला आहे. कारण गेल्या चार दिवसांपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15 हजार पोत्यांच्या सरासरीने आवक सुरु आहे. सध्याचा दर हा मध्यम असला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. सोयाबीनचा साठा असला तरी अधिकतर सोयाबीन हे पावसामुळे डागाळलेले आहे. सध्याचा दर हाच योग्य असून शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री सुरु ठेवणेच फायद्याचे राहणार आहे.
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कल कमीच
राज्यभरात नाफेडच्यावतीने तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. शनिवारपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरवातही झाली आहे. मात्र, खरेदी केंद्र सुरु होताच बाजारपेठेतही खरेदी केंद्राप्रमाणेच दर मिळालेले आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता पुन्हा बिलासाठी 15 दिवासांची वेटींग यामुळे शेतकरी थेट व्यापाऱ्यांकडे तूर विक्री करीत आहेत. अजूनही मोठ्या प्रमाणात आवक सुरु झालेली नाही. आवक सुरु होताच बाजारातले दर कमी होतील तेव्हाच शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचा आधार घ्यावा लागणार आहे. खरेदी केंद्रावर तुरीली 6 हजार 300 रुपये हमीभाव मिळत आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर
लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6350 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5800 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6811 रुपये क्विंटल, जानकी चना 4818 रुपये क्विंटल, विजय चणा 4750, चना मिल 4600, सोयाबीन 6500, चमकी मूग 6800, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7000 एवढा राहिला होता.