मुंबई : हाथरसमधल्या कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे सध्या देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत असतानाच देशभरामध्ये दररोज सरासरी 87 बलात्कार नोंदवले जात असल्याचं उघडकीला आलंय.
29 सप्टेंबरला प्रसिद्ध करण्यात आलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालात असं म्हटलंय. वर्ष 2018च्या तुलनेत 2019मध्ये महिलांवरच्या अत्याचारांच्या गुन्ह्यांचं प्रमाण 7.3 % वाढल्याचंही या अहवालात म्हटलंय.2019 मध्ये भारतभरात महिलांवरच्या अत्याचारांचे एकूण 4,05,861 गुन्हे नोंदवण्यात आले.महिलांवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वांत जास्त असल्याचा NCRBचा अहवाल आहे. 2019मध्ये महाराष्ट्रामध्ये बलात्कार करून खून करण्याची 47 प्रकरणं घडली.
तर उत्तर प्रदेशामध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. उत्तर प्रदेशात 59,853 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.नवरा वा नातेवाईकांकडून अत्याचार, महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला करणं, महिलांचं अपहरण वा जबरदस्तीने नेणं आणि बलात्कारासाठीच्या कलमांखाली बहुतेक गुन्ह्यांची नोंद झाल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालात म्हटलंय.