Advertisement

मरणाचे उथळ राजकारण

प्रजापत्र | Sunday, 04/10/2020
बातमी शेअर करा

बीड : आत्महत्या, मग ती कोणाचीही असो ती वेदनादाईच असते. ज्याच्या घरातला व्यक्ती जातो, त्यालाच त्या वेदना माहित असतात . मात्र एखाद्याच्या मृत्यूचे देखील राजकारण होऊ लागले , आणि त्यात पुन्हा तोंडघशी पडण्याची वेळ आली, तर त्या कुटुंबाला होणाऱ्या वेदना तर अधिक असतातच , पण समाजाच्या मानसिकतेवर देखील त्याचा परिणाम होत असतो.  बीड तालुक्यातील केतुरा येथील विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणात हेच घडले असून भाजपसह शिवसंग्राम सारख्या पक्षांपासून अगदी पार्थ पवारांसारख्या पोरकट नेत्यांचा उथळपणा देखील समोर आला आहे. मयताचे देखील राजकारण करण्याचा पायंडा समाजाला अडचणीत आणणारा आहे.
मराठा आरक्षण ही राज्यातील बहुसंख्य समाज असलेल्या समाजाची भावना आहे. त्यासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन उभारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र याचा अर्थ या मागणीसाठी एखाद्याच्या मृत्यूचे राजकारण करावे हे मात्र पटणारे नाही. बीड तालुक्यातील केतुऱ्याच्या प्रकरणात तेच उथळ राजकारण झाले. केतुरा येथील बारावीची परीक्षा दिलेल्या तरुणाने आत्महत्या केली. अंत्यविधी होईपर्यंत ही आत्महत्या कशासाठी आहे हे घरचे लोक देखील सांगत नव्हते. मात्र त्यानंतर काही वेळातच एक चिट्ठी मयत विवेकची असल्याचे सांगून व्हायरल केली गेली आणि विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असे भासवण्याचा प्रयत्न झाला. ती चिट्ठी खरी आहे का ? ती कोठे सापडली? पोलीस पंचनाम्यात का नव्हती ? असे साधे प्रश्न देखील कोणाला पडले नाहीत. आणि याचे राजकारण सुरु झाले. विवेक जीवानिशी गेला , पण त्याच्या मृत्यूवरून सरकारला घेरण्यासाठी भाजप नेत्यांचा उथळपणा सुरु झाला. त्याला शिवसंग्रामने साथ दिली. विरोधी पक्षाने देखील कशाचे राजकारण करावे याचे काही संकेत असतात,इथे ते पळाले गेले नाहीत. भाजपचे कार्यकर्ते, नेते, आमदार, खासदार यांची केतुऱ्याला  रीघ लागली आणि 'पिपली लाईव्ह ' ची आठवण व्हावी तसे 'केतुरा लाईव्ह ' सुरु झाले. भाजप, शिवसंग्राम, मराठा क्रांती मोर्चा यांचे ठीक , त्यांचे स्वतःचे काही अजेंडे आहेत, मात्र एका महामंडळाचे अध्यक्ष म्हणून संवैधानिक पदावर बसलेल्या आणि समाजासाठी प्रसंगी टोकाचा त्याग करणाऱ्या आण्णासाहेब पाटलांचा वारसा मिरवणाऱ्या नरेंद्र पाटलांनीही याच उथळपणाची री ओढली, सरकारला बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र (हा आरोप आता पोलिसांनी केला आहे ) आखले जाते, खोडसाळपणा केला जातो, त्या खोडसाळपणाच्या पखाली सरकारी महामंडळाचे अध्यक्ष असलेल्या नरेंद्र पाटलांनी वाहिल्या. कुठलीही माहिती न घेता प्रतिक्रिया देत जे लोक प्रतिक्रियावादी बनले, त्यांच्यामुळे राज्यातील एका मोठ्या समाजाला तोंडघशी पडण्याची वेळ आली.
ज्या चिट्ठीच्या आधारे विवेकच्या आत्महत्येला मराठा आरक्षणाशी जोडले जात होते, ती चिट्ठीच बनावट निघाली. खरेतर हा प्रकार समाजाला तोंडघशी पडण्याचा आहे. यापूर्वी अशाच काही प्रकरणांमुळे शेतकरी आत्महत्या बदनाम झाल्या होत्या. आता काहींच्या राजकारणासाठी विवेकच्या आत्महत्येचे मृत्यूनंतरही धिंडवडे निघावेत हे रहाडे कुटुंबासाठी आणि समाजासाठी देखील वेदनादायी आहे. अशाने समाजाची विश्वासार्हता कमी होत असते हे तरी कोणी लक्षात घेणार आहे का ?

Advertisement

Advertisement