कानपूरमधील अत्तर व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरावर टाकलेल्या धाडीमध्ये कोट्यांवधींची बेहिशोबी मालमत्ता सापडली असून ही संपत्ती पाहून अधिकारीही चक्रावले आहेत. संपूर्ण देशभरात या कारवाईची चर्चा आहे. सोमवारी तब्बल १२० तासांनी ही कारवाई संपली तेव्हा जैन यांच्या घरामधून एकूण २३ किलो सोनं सापडलं आहे. कानपूर आणि कन्नौज येथील अत्तराचे व्यापारी असणारे जैन यांचा संबंध सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणातही असल्याचं संशय व्यक्त केला जातोय.
२३ किलो वजनाच्या सोन्याच्या विटा, बिस्कीटं…
पियूष जैन यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या विटा आणि बिस्कीटं आढळून आली आहेत. त्यामुळेच हे सर्व सोनं तस्करी करुन, यंत्रणांच्या नजरेआडून आणण्यात आल्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे. जीसीएटी इंटेलिजन्सच्या म्हणजेच डीजीजीआयच्या अधिकाऱ्यांना पियूष जैनच्या घरात सापडलेलं २३ किलो सोनं हे दुबईवरुन तस्करी करुन आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पियूष जैनच्या बेहिशेबी मालमत्तेचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत आणि सोन्याच्या तस्करीपर्यंत जोडले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. यापैकी बऱ्याच सोन्याच्या गोष्टींवर हे सोनं परदेशातील असल्याचं चिन्हांकित करण्यात आलं आहे.